ताडदेवमध्ये मंदिरातून परतणाऱ्या तरुणीवर लोखंडी दरवाजा कोसळला

योगेश सी पटेल
मुंबई : ताडदेव परिसरात मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या एका पारशी तरुणीच्या अंगावर जीर्ण लोखंडी दरवाजा कोसळल्याची धक्कादायक घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. या दुर्घटनेत तरुणीला गंभीर दुखापत झाली. दरवाज्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या साइट सुपरवायझर विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला नोटीस देण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात थेट आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गामदेवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडदेव येथील पाटील इस्टेट कंपाऊंडजवळील सचिनम हाइट्स इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ २७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजता ही घटना घडली. जेनी यझदी बामजी (२३) ही तरुणी लोखंडी दरवाजा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाली. या प्रकरणी तिचे वडील यझदी बामजी (५८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनय बाबू शाह (५३) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जेनी ही झोराष्ट्रीयन कॉलनीतील ताराचंद बिल्डिंगमध्ये राहत असून, ती दररोज सकाळी पाटील इस्टेट कंपाऊंडमधील अंबामाता मंदिरात दर्शनासाठी जात असे. घटनेच्या दिवशी दर्शन घेऊन परतत असताना सचिनम हाइट्स इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील लोखंडी दरवाजा अचानक तिच्या अंगावर कोसळला. वजनदार दरवाजा अंगावर पडल्याने जेनी जमिनीवर कोसळली.
घटनेच्या वेळी जवळच्या जिममधून बाहेर पडलेल्या संगीताबेन प्रजापती यांनी जेनीच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर जेनीला भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्या वडिलांना फोनवरून घटनेची माहिती देण्यात आली.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी जेनीला गंभीर दुखापत झाल्याचे तिच्या वडिलांना सांगितले. तिच्या डोक्याच्या मागील भागाला दुखापत झाली असून, दोन्ही गालांजवळील हाडे आणि नाकाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच तोंडाच्या आतील भागाला गंभीर दुखापत होऊन तीन दात तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, जेनीच्या वडिलांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता समोरील बी विंगमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोन ते तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये लोखंडी दरवाजा जेनीच्या अंगावर कोसळताना स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपचारानंतर जेनीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. गावदेवी पोलिसांनी निष्काळजीपणाच्या आरोपावरून १० सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत मोहिते यांनी ‘मुंबई समाचार’ला सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी विनय शाह याला नोटीस देण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.



