म्हाडा नाशिक मंडळातर्फे ‘प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर ३२४ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ

मुंबई:नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद शिवार, सातपुर शिवार, विहितगाव शिवार, सिन्नर फाटा, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, आगर टाकळी शिवार, गंगापूर शिवार, देवळाली शिवार, चेहडी शिवार, मेरी-रासबिहारी लिंक रोड, आडगाव शिवार येथे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील सोडतीत रिक्त राहिलेल्या ३२४ सदनिका ‘प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला आज प्रारंभ करण्यात आला.
२० टक्के सर्वसमावेशक योजनेतील रिक्त सदनिका ‘प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर विक्रीसाठी तयार केलेल्या https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच इच्छुक अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. सदर सदनिका विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आजपासून दिनांक १२ सप्टेंबर, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज करता येणार आहे. दिनांक ०९ सप्टेंबर, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दि. १२ सप्टेंबर, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकृती व योजना निश्चित करता येणार आहे. प्रशासकीय रकमेचा भरणा सदनिका निवडल्यानंतर ४८ तासांच्या आत करणे गरजेचे आहे.
इच्छुक अर्जदारांना आवाहन करण्यात येते की, नाशिक मंडळातर्फे सदनिकांच्या वितरणासाठी किंवा या बाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार करू नये तसे केल्यास नाशिक मंडळ अथवा म्हाडा प्रशासन कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही. तसेच अर्जदारास कोणी दलाल/ व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे आदी बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांना ०२२- ६६४०५४४८ या दूरध्वनी क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर सदनिका विक्रीसाठी समावेश असलेल्या योजनांची सविस्तर माहिती, पात्रता निकष, आरक्षण, अर्ज करण्याची कार्यपद्धती, अटी व शर्ती इत्यादी व्हावी नमूद असलेली माहिती पुस्तिका म्हाडाच्या https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच सोबत नमूद असलेल्या क्यू आर कोडवरही उपलब्ध आहे. सदर प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. अर्ज नोंदणीकरिता ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर तसेच अधिक माहितीसाठी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या गृहनिर्माण भवन, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक येथील कार्यालयात किंवा ०२५३- २२२९२१०, २२२९२०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.



