मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियानाला वेग; ६८ किमी पदपथ अडथळामुक्त

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील पदपथ मुंबईकरांसाठी मोकळे करण्याची मोहीम सुरू केली आहे.’पादचारी प्रथम’या नावाने ही मोहीम १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली असून १४ ऑगस्टपर्यन्त एकूण ३३७ कारवाया करण्यात आल्या आहेत.
या अभियानांतर्गत मुंबई शहर व उपनगरांमध्ये पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अडथळे, साठवणूक साहित्य,फलक,बॅनर तसेच पादचारी मार्गात येणारे अन्य अडथळे दूर करण्यासाठी व्यापक कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी सुरू असून, पहिल्या टप्प्यात २०० पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यापैकी ८१ पदपथांचे काम हाती घेण्यात आले आहे.
सुमारे ६८ किलोमीटर अंतर इतके पदपथ अडथळामुक्त करण्यात आले असून ४४३ अतिक्रमण व इतर कारवाई सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेमध्ये ७७ अनधिकृत बांधकामे आणि ११२ अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्यात आले आहे. यासोबतच पदपथांवरील ४९ स्ट्रीट फर्निचर, ६३ साठवणूक साहित्य, २७ दुकानांचे फलक, १४ साईनबोर्ड आणि ४९ बॅनर हटविण्यात आले आहे.पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या २५ अधिकृत दुकानांलगतच्या संरचनांची दुरुस्ती, ८ पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांवर निर्माण झालेल्या ८ अनधिकृत वाहनतळांचे निर्मूलन करण्यात आले आहे.
मुंबईतील जवळपास निम्म्या दैनंदिन प्रवासाचा पायी सहभाग
मुंबईतील जवळपास ५० टक्के दैनंदिन प्रवास पायी केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी असमान किंवा खचलेले पदपथ, चालण्याच्या जागेतील अडथळे, अपूर्ण अथवा सदोष पदपथ रचना, फलक-बॅनर, झाडे, साठवणूक साहित्य, फेरीवाल्यांचा पसारा, अनधिकृत रॅम्प, पार्क केलेली किंवा बेवारस वाहने आदींमुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागते.यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच वाहतूक कोंडी, वाहनांचा वेग कमी होणे आणि त्यातून होणारे वायुप्रदूषण यांसारखे परिणामही होतात.
मुंबई रस्ता सुरक्षेचा वार्षिक अहवाल सन २०२३ नुसार रस्ते अपघातातील एकूण मृत्यूंपैकी ४४ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे होते. त्यामुळे सुरक्षित, सलग आणि सर्वांसाठी सुलभ पदपथ निर्माण करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेच्या वतीने हे अभियान हाती घेतले आहे.रेल्वे, मेट्रो, बसस्थानकांपासून शाळा, रुग्णालये आणि बाजारपेठांना यात प्राधान्य आहे.
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यांत पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असलेल्या तसेच ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती आणि इतर संवेदनशील घटक मोठ्या प्रमाणावर वापर करतात अशा ठिकाणच्या पदपथ सुधारणांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, बसस्थानके, रुग्णालये, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे.
पादचारी प्रथम हे अभियान अतिक्रमण हटविण्यापूरते मर्यादित नाही तर पदपथ वापरण्यायोग्य सुधारण्यासाठीही आहे.पदपथ अडथळामुक्त ठेवण्यासाठी पालिकेकडून सतत कार्यवाही केली जाणार आहे.प्रत्येक विभागात सहाय्यक आयुक्त दर महिन्याला पाहणी करून अतिक्रमण व इतर अडथळे दूर राहतील यासाठी उपाययोजना करतील. तसेच प्रत्येक प्रशासकीय विभागाकडून साप्ताहिक अहवाल सादर केला जाणार त्यात पदपथाचे नाव कार्यवाहीची तारीख आणि छायाचित्रे यांचा समावेश असेल.परीमंडळातील प्रत्येक उपायुक्त या अहवालाची पडताळणी करतील.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून अंमलबजावणीच्या प्रगतीचा दर पंधरा दिवसाला आढावा घेतला जाणार आहे. तसेच मार्ग पोर्टलवरून प्राप्त होणाऱ्या पदपथांवरील अतिक्रमणासंदर्भातील तक्रारींचे विहित कालमर्यादेत निराकरण करून त्याचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.
कार्यवाही नंतर अतिक्रमण होऊ नये यासाठी सतत देखरेख ठेवण्यात येणार आहे. जर अतिक्रमण झाले तर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.



