मुंबई

‘विकसित भारत २०४७’ च्या प्रवासात विकसित मुंबई घडविण्याचा संकल्प : महापौर रितू तावडे

भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर रितू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महापौर श्रीमती तावडे यांनी मुंबईकर नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, इतर अधिकारी व मान्यवर, मुंबईकर नागरिक यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईकरांना उद्देशून संबोधित करताना, महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करून ‘विकसित भारत २०४७’च्या प्रवासात मुंबईचे योगदान निर्णायक असल्याचे सांगितले. मुंबईला जागतिक दर्जाचे, स्वच्छ, स्मार्ट, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक महानगर बनविण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’ आणि ‘इझ ऑफ लिव्हिंग’ वर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईच्या विकासासाठी नागरिकांचा सहभाग, नागरी शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे सांगत तंत्रज्ञानाने सक्षम, पर्यावरणाने सुरक्षित आणि कष्टकऱ्यांचा सन्मान जपणारी मानवी मुंबई घडवायची आहे, असा निर्धार महापौरांनी व्यक्त केला. तसेच, ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित राष्ट्रव्यापी उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्य दिन वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रारंभी महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर रितू तावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल आणि सुरक्षा पथकाच्या वतीने महापौर श्रीमती रितू तावडे यांना मानवंदना देण्यात आली.
महानगरपालिका सचिव खात्यातर्फे निर्मित ‘वार्षिक प्रकाशन २०२६’ चे प्रकाशन महापौर श्रीमती तावडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी, जवानांचा सत्कार

उल्‍लेखनीय कामगिरीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्‍या एकूण १३ जणांना भारताचे माननीय राष्ट्रपती यांच्याकडून, राष्‍ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. शौर्यपदक प्राप्त अधिकारी व जवानांना मुंबईच्‍या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

चेंबूर येथे गेल्या वर्षी १९ ऑगस्‍ट २०२५ रोजी बंद पडलेल्‍या मोनोरेलमधील ५८२ अडकलेल्‍या प्रवाशांची मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी – जवानांनी सुखरूप सुटका केली होती. या कामगिरी बद्दल प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. अनिल परब, विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. एम. व्‍ही. सावंत, वरिष्‍ठ केंद्र अधिकारी आय. के. कांबळे, केंद्र अधिकारी वाय. एच. पवार, केंद्र अधिकारी डी. ए. भोसले, यंत्रचालक श्री. राजेश राणे, यंत्रचालक श्री. महेश गुडुलकर, अग्निशामक श्री. रमेश कोळी, अग्निशामक श्री. हर्षल कटके, अग्निशामक श्री. चिंतामणी खांडेकर, अग्निशामक श्री. विकी सरवदे, अग्निशामक श्री. सुदर्शन पावडे यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Related Articles

Back to top button